आमटीचे प्रकार मुख्यपान

आमसुलाचे सार

साहित्य - १०-१५ आमसुले, १/२ नारळाचे दूध, मीठ, तिखट, साखर, थोडे वाटलेले जिरे.

कृती - ४ कप पाण्याला उकळी आणावी व त्यात आमसुले तासभर भिजत घालावीत. नारळाचे दूध काढावे. आमसुले भिजत घातलेले पाणी गार झाले की त्यातून आमसुले काढून टाकावीत, त्यात नारळाचे दुध, मीठ, साखर थोडे तिखट व वाटलेले जिरे घालावीत, वरून हिंग-जिरे घालून तुपाची फोडणी द्यावी. हे सार पुन्हा गॅसवर ठेवून गरम करायचे नाही. ह्या सारात नारळाच्या दुधाऐवजी गोड ताक घातल्यासही चव चांगली येते.

आंब्याची आमटी

साहित्य - हरभरा डाळ, कैरी, मीठ, गूळ, गरम मसाला, डाळीचे पीठ, फोडणीचे सामान,

कृती - हरभर्‍याची डाळ व कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात. त्यात मीठ, जरा जास्त गूळ व गरम मसाला घालावा. थोडे डाळीचे पीठ पाण्यात कालवून त्यात ओतावे. (तिखट घालू नये.) नंतर हिंग, मोहरीची फोडणी करून आमटीत घालावी.

ओसामण

साहित्य - १ वाटी तुरीच्या डाळीचे घट्ट वरण, ५-६ आमसुले, मीठ, गूळ, लवंग, दालचिनी, जिरे, कोथिंबीर, कडीलिंब, आल्याचा तुकडा, ३-४ हिरव्या मिरच्या.

कृती - वरणात पाणी घालून सारखे करावे. हिंग, जिरे, घालून तुपाची फोडणी करावी. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीलिंब घालावा. त्यावर वरील वरणाचे पाणी घालावे. मीठ व गूळ घालावा. लवंग, दालचिनी, जिरे व आले वाटून घालावे. थोडा काळा मसाला घालावा. चांगले उकळले की उतरवावे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF